प्रवेशापूर्वी शाळेची शासनमान्यता व युडायस क्रमांक तपासा – गटशिक्षणाधिकारी आमले



पालम/प्रतिनिधी - नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालम शहर व तालुक्यातील पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश घेताना विशेष दक्षता घ्यावी. शासनमान्यता प्राप्त आणि अधिकृत यु-डायस क्रमांक असलेल्या शाळांमध्येच विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करावेत, असे आवाहन पालमचे गटशिक्षणाधिकारी सुभाष आमले यांनी केले आहे.

काही संस्था आवश्यक परवानग्या व मान्यता न घेता शाळा किंवा वर्ग सुरू करतात. अशा अनधिकृत शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची तसेच पुढील शिक्षणाच्या टप्प्यावर विविध अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पालकांनी कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना बळी न पडता केवळ शासनमान्य शाळांचीच निवड करावी, असे आमले यांनी स्पष्ट केले.

पालम तालुक्यातील शासनमान्य शाळांची तसेच शासनाची मंजुरी प्राप्त संस्थांची अधिकृत यादी गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती पालम येथे नोटीस बोर्डावर प्रसिद्ध

करण्यात आली आहे. पालकांनी प्रवेश निश्चित करण्यापूर्वी या यादीची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी जागरूक राहून प्रवेश प्रक्रियेदरम्यान आवश्यक पडताळणी करावी, असेही शिक्षण विभागाने म्हटले आहे. ज्या संस्था शासनमान्य नाहीत, युडायस/युआयडी क्रमांक प्राप्त नाहीत किंवा पालकांकडून अवाजवी शुल्क आकारत आहेत, अशा संस्थांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा गटशिक्षणाधिकारी सुभाष आमले यांनी दिला आहे.