पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी तसेच उन्नतीसाठी नेहमी प्रयत्नशील राहणार - तालुकाध्यक्ष गुणवंत सराफ
पालम -पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी तसेच उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीने पालम तालुक्यातील पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. संघटनेचे आंतरराष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या संकल्पनेतून पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या पंचसूत्री कार्यक्रमांतर्गत पालम तालुक्यातील व्हाईस ऑफ मीडियाच्या २० पत्रकारांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे विमा कवच देण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष विजयजी चोरडिया आणि परभणी जिल्हाध्यक्ष कैलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालम तालुका व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष गुणवंत सराफ यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. पत्रकारिता करताना विविध आव्हानांना सामोरे जावे लागते. वृत्तांकनासाठी पत्रकारांना अनेकदा अपघातप्रवण ठिकाणी, आपत्तीच्या परिस्थितीत तसेच विविध संवेदनशील घटनास्थळी जावे लागते. अशा परिस्थितीत पत्रकारांना आर्थिक सुरक्षा मिळावी, या उद्देशाने विमा संरक्षणाचा निर्णय घेण्यात आला.
दि. १५ ऑगस्ट रोजी पालम तालुका व्हॉइस ऑफ मीडियाच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पत्रकारांच्या विविध अडचणी, समस्या, आव्हाने तसेच पत्रकारांच्या हिताशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पत्रकारांच्या सुरक्षिततेचा विषय प्राधान्याने घेण्यात आला. आणि पत्रकारांचा १० लाख रुपयांचा विमा उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला. शत्यानुसार इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून २० पत्रकारांचा प्रत्येकी १० लाख रुपयांचा विमा काढण्यात आला. पत्रकारांच्या कुटुंबीयांना अनपेक्षित प्रसंगी आर्थिक आधार मिळावा आणि पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षेला बळकटी मिळावी, या दृष्टिकोनातून हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष गुणवंत सराफ यांच्यासह चांद तांबोळी, भास्कर लांडे, धोंडीराम कळंबे, गोविंद सोलेवाड, रुखमाजी गिणगीने, शिवाजी शिंदे, प्रल्हाद पांचाळ, भगवानराव करंजे, विनोद कांबळे, गणेश काकडे, सुनील कवटकवार, केरबा बहिरवाड, अंबादास ठाकूर, रावसाहेब व्हावळे , लक्ष्मण दुधाटे, अंकुश वाघमारे, मोतीराम शिंदे, शेषराव सोपने सह बालासाहेब फुलपगार हे व्हॉइस ऑफ मीडियाचे पत्रकार बांधव उपस्थित होते.
पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद असून, ग्रामीण भागातील पत्रकारांना सामाजिक सुरक्षा देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम आदर्श ठरणारा आहे.

0 Comments